प्रेक्षकांसाठी मेजवानी! छोट्या पडद्यावर ‘या’ दिगग्ज अभिनेत्याचं होतंय पदार्पण ! साकारणार पराक्रमी बाजीप्रभूंची भूमिका…

‘छत्रपती शिवाजी महाराज’ हे एक नाव ऐकलं तरी आजही अंगावर शहारे उभे ठाकतात.त्यांचा इतिहास बघण्यासाठी, सर्वच नेहमी उत्सुक असतात. त्यासाठी, काही थरार प्रेक्षकांच्या भेटीला देखील आले होते. फर्जंद, फत्तेशिकस्त यासारखे मराठी सिनेमा तर; तान्हाजी सारखा हिंदी सिनेमा बनला होता. सर्वच सिनेमांनी बॉक्स ऑफिस वर कमालच केली.
त्यापूर्वी खासदार अमोल कोल्हे यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनचरित्रावर आधारित मालिका बनवल्या होत्या. या दोन्ही मालिकांना प्रेक्षकांनी उत्तम प्रतिसाद दिला होता. त्याच पार्श्वभूमीवर एक नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘जय भवानी जय शिवाजी’ हि मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
या मालिकेबद्दल कमालीची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये आहे. स्वराज्याकरिता आपल्या जीवाची बाजी लावणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिलेदारांची शौर्यगाथा या मालिकेच्या रुपात उलगडन्यात येणार आहे. आणि त्यातच बातमी आली आहे कि,या मालिकेत सुप्रसिद्ध अभिनेते अजिंक्य देव ‘बाजीप्रभूंची’ साकारणार आहेत. हि बातमी समोर येताच चाहत्यांमध्ये आता अजूनच उत्सुकता निर्माण झाली आहे.
अजिंक्य देव हे मराठी सिनेसृष्टीमधील एक मोठं नाव आहे. यापूर्वी आपण तान्हाजी सिनेमा मध्ये चंद्रजी पिसाळ यांच्या अगदी छोट्या भूमिकेमध्ये, मावळ्याच्या रूपात त्यांना पाहिलं आहे. आणि त्यात देखील आपल्या आकर्षित अश्या पर्सनॅलिटी मध्ये ते रुबाबदार दिसत होते. त्यामुळे आता बाजींच्या भूमिकेत देखील ते तेवढेच शोभून दिसतील याबद्दल काहीच शंका नाही.
‘माझ्या करिअरची सुरुवातच सर्जा सिनेमा मधल्या ऐतिहासिक व्यक्तिरेखेनं झाली होती. म्हणून आता बाजीप्रभूंची भूमिका साकारताना मला प्रचंड आनंद होत आहे. बाजीप्रभूंच्या शौर्याच्या आणि पराक्रमाच्या कथा आपण ऐकल्या आहेत, वाचल्या आहेत. पावनखिंडीमध्ये जीवाची बाजी लावत बाजी शेवटच्या श्वासापर्यंत लढले.
या शुरवीराची भूमिका साकारायला मिळणं हे माझ्यासाठी एक नवं आव्हानच असणार आहे.या भूमिकेसाठी अर्थातच माझा लूक देखील नवा आहे. फिटनेसच्या बाबतीच मी सततच जागरुक असतो. व्यायाम आणि खाण्यावरचं नियंत्रण यामुळेच तर मी फिट आहे. मी दररोज पाच ते सहा किलोमीटर धावतो. उत्तम आरोग्यासाठी हे सर्व गरजेचं आहे असं मला वाटतं.
या सर्वाचा उपयोग मला ‘जय भवानी जय शिवाजी’ मालिकेत बाजीप्रभूंची भूमिका साकारताना होतो आहे.’ असे अजिंक्य देव सांगतात.छोट्या पडद्यावर पुन्हा काम पदार्पण करण्याबद्दल विचारले असता ते बोलले,’याआधी प्रेमा तुझा रंग कसा या कार्यक्रमाच्या काही भागांचं मी सूत्रसंचालन केलं होतं. त्यामुळे पुन्हा एकदा स्टार प्रवाहसोबत या मालिकेच्या निमित्ताने काम करण्याचा योग आला आहे.’
या थरारक भव्यदिव्य मालिके बद्दल सांगताना स्टार प्रवाहचे कार्यक्रम प्रमुख सतीश राजवाडे बोलले, ‘छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे अखंड महाराष्ट्राचच नव्हे तर आपल्या देशाचं आराध्य दैवत. महाराजांवर अनेक कथा, कादंबऱ्या, नाटक, मालिका आणि चित्रपट निर्माण झाले आहेत. यातून छत्रपती शिवाजी महाराजांची यशोगाथा आपण पाहिली आहे.
ती वर्णावी तेवढी थोडीच आहे.आकाशसुद्धा ठेंगणं पडेल असे आपले छत्रपती शिवाजी महाराज. राजा असावा तर असा. या महान राजाच्या सेवेत अनेक रत्न होती ज्यांनी महाराजांच्या शब्दासाठी आपल्या देव देश आणि धर्मापायी प्राणांची आहुती दिली.
अशा शिलेदारांची गोष्ट सांगणारी मालिका जय भवानी जय शिवाजी सादर करताना अभिमान वाटतो आहे. ही मालिका त्या सर्व शूर वीरांना अर्पण असेल. स्वराज्यासाठी लढलेल्या प्रत्येकालाच या मालिकेच्या निमित्ताने मानाचा मुजरा.’